MKCL Home ISO 9001:2015 company.

For Support, / please call 8411960005

If you have any suggestion, feedback or grievance kindly email us on This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

आला उन्हाळा, तब्बेत सांभाळा

महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे त्यादिवशीचे देशातील सर्वाधिक तापमान ४६ डिग्री नोंदविले गेल्याची बातमी वाचण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रात अशा पद्धतीने तापमान वाढ होईल हेही पूर्वी वाचलं होतं किंबहुना काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते हेही वाचण्यात आलं होतं.

या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन थोडी आधीच तयारी करून ठेवली होती. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या बॅचेसमध्ये साडेचार लाख विद्यार्थी MS-CIT करण्यास येतात. उन्हाचा त्रास व उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी रोज MS-CIT केंद्रात जायला दिवसा घरून निघताना प्रत्येकाने पुरेसे पाणी पिऊन व डोक्यावर टोपी घालूनच घराबाहेर पडावे या सूचनांबरोबरच पाणी पिताना उत्साह वर्धक त्यांना वाटावे, या पाण्यात मिठाचा पुरेसा अंश असावा त्यामुळे आपण उष्माघात टाळू शकतो म्हणून आधीच एका मोहिमेची तयारी करून ठेवली होती. विद्यार्थ्यांना संपूर्ण महिनाभर पुरेल इतकी रेडी मिक्स पावडरची नींबू-पाण्याची पाकिटे MKCLतर्फे देण्यात आली आहेत. सुमारे दीड कोटी सॅशे ५००० MS-CIT केंद्राचालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणार आहोत. सोबत ‘उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?’ हे पत्र ही या विद्यार्थ्यांना देत आहोत जेणेकरून ते आपली आणि आपल्या परिवाराची काळजी उन्हाळ्यात घेऊ शकतील. उष्माघात विषयी त्या पत्रातील मजकूर खाली देत आहे त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकेल.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

दरवर्षी काही जण उष्माघाताने दगावल्याच्या बातम्या आपण ऐकतो, वाचतो. जागतिक हवामान बिघडत चालल्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा येऊन असे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. असा अंदाज आहे की वर्ष २०१८च्या उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण मागील काही वर्षांपेक्षा जास्त रहाणार आहे. हे सर्व लक्षात घेता उष्माघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे आपण समजावून घेऊ या.

उष्माघात होतो म्हणजे नक्की काय होते?

उष्माघाताच्या झटक्यात उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होतो व त्यावर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येऊ शकतो. भारतात गेल्या काही वर्षात दरवर्षी १००० ते २००० व्यक्ती उष्माघाताने दगावतात. उष्माघात होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली आणि ‘उष्माघाताचा झटका’ आलाच तर त्यावर ताबडतोब योग्य उपचार केले तर यातील बहुसंख्य मृत्यू टाळता येतील. हे उपचार अवघड वा महागडे नसतात. म्हणून सर्वांना उष्माघाताबाबत काही किमान माहिती असायला हवी.

उष्माघात होतो म्हणजे खूप ताप येतो, शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाईटच्या पुढे जाते व अंगाला हात लावला की खूप ताप आला आहे हे कळते. ती व्यक्ती कधी ग्लानीत असते तर कधी कधी बेशुध्द होते. तिला कधी कधी झटकेही येतात. कातडी कोरडी व लाल होते. घाम अजिबात येत नाही. डॉक्टरी तपासणीत लक्षात येते की नाडी फार जलद आहे व रक्तदाब कमी झाला आहे. रक्त-तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात. अशा परिस्थितीत वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

उष्माघात का होतो?

आपल्या शरीराचे तापमान उन्हाळ्यात, पावसाळ्यात, थंडीत कायम ९८.४ अंश फॅरेनहाईट इतकेच राहावे अशी निसर्गाची योजना असते. त्यासाठी शरीरात एक ‘तापमान-संतुलन-व्यवस्था’ असते. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला घाम जास्त येतो आणि तो वाळताना शरीरातील उष्णता वापरली जाऊन शरीराचे तापमान ९८.४ अंश फॅरेनहाईटपेक्षा वाढत नाही. या उलट थंडीत आपल्याला घाम कमी येतो.

मात्र या तापमान-संतुलन-व्यवस्थेवर तीव्र उन्हाळ्यात फार ताण पडला तर ती बिघडून उष्माघात होऊ शकतो. विशेषत: उन्हात किंवा गरम वातावरणात श्रमाचे, अंगमेहनतीचे काम करावे लागले व त्याच्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी योग्य उपाय केले नाहीत, उन्हात वावरताना डोक्यावर टोपी घालण्याची व पोट पाण्याने भरून ठेवण्याची दक्षता घेतली नाही तर आपली तापमान-संतुलन-व्यवस्था कोलमडून ‘उष्माघाताचा झटका’ (heat stroke) येऊ शकतो.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे?

जेव्हा तीव्र उन्हाळा असतो म्हणजे हवेचे तापमान ४५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त असते तेव्हा उष्माघाताची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तहानेले राहू नये. त्यासाठी वारंवार म्हणजे दर तासाला एक ग्लास पाणी प्यायला हवे व दिवसातून तीन-चार वेळा तरी पाण्यात मीठ घालून प्यायला हवे. लिंबू-सरबतात मीठ घालून किंवा ताकात मीठ घालून पिता येईल. लघवी गडद पिवळी झाली तर समजायचे की आणखी पाणी प्यायला हवे.

हवेचे तापमान ४४ अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल त्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत घराबाहेर पडावे लागल्यास उन्हापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. उन्हाळ्यात घरातून बाहेर पडण्यापूर्वी पुरेसे पाणी किंवा मीठ घातलेले लिंबू सरबत पिण्याची स्वत:ला सवय लावावी. घरातून बाहेर पडताना व विशेषत: प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे व डोक्यावर शक्यतो पांढरी टोपी घालावी.

विशेषत: तीव्र उन्हाळ्यामध्ये उन्हात, गरम वातावरणात खूप श्रमाचे काम करणे टाळले पाहिजे. मधून मधून सावलीत थांबावे व शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी. उन्हात काम करावे लागलेच तर शरीर पूर्ण झाकले जाईल असे सुती कापडाचे पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घालावे. असे केल्याने सूर्याचे किरण शरीरात शोषले न जाता परावर्तीत केले जातात. मात्र कपडे गळा-बंद असू नये, हवा खेळती राहील असे कपडे असावे.

पाच वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, खूप लट्ठ व्यक्ती, दारुच्या अमलाखाली असणारे, काही विशिष्ट औषधे घेणारे यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो. तसेच रस्त्यावर, शेतात काम करणारे श्रमिक, रस्त्यावर विक्रीसाठी फिरणारे निरनिराळे फेरीवाले, उन्हात खूप वेळ वाहने चालवणारे रिक्षा-ड्रायव्हर, गरम वातावरणात काम करावे लागणारे कामगार यांनीही विशेष काळजी घ्यायला हवी. दमट हवेत काम करणा-यांना दमट हवेमुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम येत नाही. त्यामुळे अशांनाही उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. अशा सर्वांनी उष्माघात टाळण्यासाठी वर दिलेला सल्ला कटाक्षाने पाळावा. MS-CIT विद्यार्थ्यांनी स्वत:ची काळजी घेताना आपल्या परिसरातील अशा व्यक्तींनासुद्धा ही माहिती स्वत: पुढाकार घेऊन देत राहण्याचे समाजोपयोगी काम करावे.

दवाखाने, रुग्णालये, प्रवासी थांबे, एस टी स्टँड, रेल्वे स्टेशन, प्रार्थना स्थळे इ. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्यांसाठी पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही MS-CIT विद्यार्थी स्थानिक सेवाभावी संस्थांच्या पाणपोईत स्वयंसेवक या नात्याने तास-दोन तास मदत करू शकतील.

उष्माघात कसा ओळखावा?

उष्माघात अगदी अचानक, अनपेक्षितपणे येत नाही. नीट लक्ष दिले तर त्याची आधी चाहूल लागते. उन्हाळ्यात तहान, थकवा घालवण्यासाठी मीठ घालून पाणी, सरबत किंवा ताक पिणे, सावलीत, गार हवेत विश्रांती अशा गोष्टी केल्या नाहीत, तुलनेने सौम्य बिघाडाकडे, पूर्व-सूचनेकडे दुर्लक्ष केले तर खूप थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे, पायाचे व पोटाचे स्नायू दुखणे, त्यात पेटके येणे (heat cramps) असा त्रास होतो. हा त्रास म्हणजे खरे तर उष्माघाताची पूर्वसूचना होय. ती ओळखून सावलीत, शक्यतो गार जागेत विश्रांती घेणे, भरपूर पाणी, मीठ घेणे हे अगदी कटाक्षाने करायला हवे. पण अशी पुरेशी काळजी घेतली गेली नाही आणि पाणी किंवा मीठ कमी पडले तर शरीरातील बिघाड वाढून उष्म दमछाक (heat exhaustion) होते. यात खूप घाम येतो, प्रचंड थकवा येतो, चक्कर मळमळ, उलटी असा त्रास होतो. कधी कधी ताप येत नाही, उलट कातडी थंड लागते. कधी कधी भ्रमिष्टासारखी अवस्था होते. अशा व्यक्तीला वेळीच सावलीत, शक्यतो गार जागेत हलवून विश्रांती द्यायला हवी. भरपूर पाणी व पुरेसे मीठ पोटात जाईल असे पहायला हवे. असे केले नाही तर शेवटी उष्माघाताचा झटका (heat stroke) येतो. वर दिल्याप्रमाणे अशा व्यक्तीमध्ये १०४ अंश फॅरेनहाईटपेक्षा जास्त ताप, ग्लानी/बेशुध्दी किंवा झटके, कोरडी त्वचा, जलद नाडी, घसरलेला रक्तदाब अशी लक्षणे, चिन्हे दिसतात.

उष्माघातावर काय उपचार करतात?

उष्माघाताची वर दिलेली लक्षणे, चिन्हे दिसली तर ताबडतोब उपचार करायचे असतात. प्रथमोपचार म्हणून रुग्णाला सावलीत, गार जागेत हलवणे, कपडे काढून ओली चादर लपेटणे, त्यावर वारा घालत राहणे हे करायला हवे. बर्फ, बर्फाचे पाणी मिळाल्यास त्याचा वापर करावा व रुग्णाला लवकरात लवकर दवाखान्यात हलवावे.

दवाखान्यात नेल्यावर या रुग्णाचा ताप लवकरात लवकर, शक्यतो काही मिनिटांमध्ये रुग्णाचे तापमान ३८ अंश सेल्सियसखाली आणण्यासाठी रुग्णावर गार पाण्याचा फवारा उडवून त्याला पंख्याच्या झोताखाली ठेवतात. बर्फ, बर्फाचे पाणी असल्यास त्याचा वापर करतात. फ्रीज मध्ये ठेवलेले सलाईन नीलेवाटे देणे, बर्फाच्या पाण्याचा एनिमा देणे असे उपायही परिस्थितीनुसार केले जातात. मात्र गार पाण्याचा फवारा व पंख्याचा झोत यावरच सहसा भर देतात. मलेरिया इ. दुसरा कोणता आजार नाही ना, उष्माघातामुळे शरीरात आणखी काही बिघाड झालेला नाही ना हे बघण्यासाठी रक्त इ. तपासतात आणि गरजेनुसार पुढील उपचार करतात.

सारांश

उष्माघाताबद्दल हे लक्षात ठेवा

  1. उन्हात, गरम हवेत सतत काम करणे टाळावे. मधून मधून सावलीत थांबावे.
  2. शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी.
  3. तहान लगेच भागवावी. त्यासाठी दर तासाला एक ग्लास पाणी प्यावे.
  4. लघवी गडद पिवळी होणार नाही एव्हढे पाणी प्यावे.
  5. हवेचे तापमान ४४ अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ऊन व उष्मा यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.
  6. दिवसातून तीन-चार वेळा तरी पाण्यात थोडे मीठ घालून प्यावे.
  7. उन्हातून येता-जाता पांढरी टोपी, स्कार्फ, गॉगल्स, छत्री, सनकोट या गोष्टींचा वापर करावा.
  8. पांढरे किंवा फिकट रंगाचे, शरीर पूर्ण झाकले जाईल पण हवा खेळती राहील असे सुती कपडे घालावे.
  9. घरातून बाहेर पडतांना, विशेषत: प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.
  10. उष्माघाताची शंका आल्यास रुग्णाला लगेच सावलीत नेऊन, अंगावर ओली चादर लपेटून वारा घालत दवाखान्यात न्यावे.
Go to top

Find Nearest ALC Here